मुंबई, दि. ८ नोव्हेंबर २०२५ —
माहिम (पश्चिम) येथील मुंबई महानगरपालिकेची मराठी शाळा सध्या धोक्याच्या छायेत आली असून, शाळेवर लवकरच बुलडोझर फिरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेचा “स्ट्रक्चरल अहवाल” महानगरपालिकेला आपल्या मनासारखा मिळाल्याने, तोडफोडीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठीप्रेमी, पालक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या निर्णयाचा तीव्र विरोध करण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांचा सवाल आहे —
“मराठी शाळांबाबत इतकं विध्वंसक घडत असताना आपण हे सगळं निमूटपणे पाहत राहायचं का?”
मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले असून, या आंदोलनासाठी सर्व मराठीप्रेमी नागरिकांना रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📍 ठिकाण: न्यू माहीम म.न.पा. शाळा,
एन.एम. छोटानी रोड, क्रॉस नं. ४,
झोराष्ट्रीयन बँकेसमोर, माहीम (पश्चिम), मुंबई – १६.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ एका शाळेची लढाई नसून — ती मराठी शिक्षण व संस्कृतीच्या अस्तित्वाची लढाई आहे. “मराठी शाळा वाचवा” या घोषवाक्याखाली स्थानिक नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
— मुंबई प्रतिनिधी
