मिरा-भाईंदरचे भाजप आमदार मराठी माणसाचा इतका द्वेष का करतात? — सिद्धेश प्रकाश राणे यांचा सवाल

मिरा-भाईंदर, दि. ८ नोव्हेंबर २०२५ —
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ३५८ रिक्त पदांच्या भरतीवर स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.

मिरा-भाईंदरचे भाजप आमदार मराठी माणसाचा इतका द्वेष का करतात? — सिद्धेश प्रकाश राणे यांचा सवाल मिरा-भाईंदर, दि. ८ नोव्हेंबर २०२५ —मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ३५८ रिक्त पदांच्या भरतीवर स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.

महापालिकेच्या गट-क संवर्गातील ३५८ रिक्त पदांसाठी पूर्वी पदभरती सूचना जाहीर करण्यात आली होती. निर्धारित शैक्षणिक पात्रता आणि अटी-शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी सरळसेवा प्रवेशाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या भरती प्रक्रियेसाठी मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांची निवड करण्यात आली होती आणि त्यांना मानधन अदा करून, पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व परीक्षा प्रक्रिया महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पार पडली होती.

तथापि, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थगितीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सरळसेवा पदभरती प्रक्रियेवर स्थगितीचे आदेश दिले.

यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे म्हणाले,

“जेव्हा मराठी माणसाला कुठे संधी मिळते, त्याचं भलं होणार असतं, तेव्हा भाजप आमदार तिथे खोडा घालतात. आणि जेव्हा मराठी जनतेवर अन्याय होतो, तेव्हा मात्र ते मौन बाळगतात! आमदार साहेब मराठी माणसाचा इतका द्वेष का करता?”

राणे यांनी पुढे म्हटले की, ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि नियमबद्ध होती, मात्र राजकीय हेतूने मराठी युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

या निर्णयामुळे मिरा-भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातील असंख्य मराठी युवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, युवक काँग्रेसने या अन्यायकारक स्थगितीविरोधात तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

ठाणे प्रतिनिधी, मिरा-भाईंदर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top