मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषता मुंबईत मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मोठा लढा उभा राहिला आहे. यात राज ठाकरे यांच्या २००६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाचा मराठी हा मुद्दा महत्वाचा राहिला आहे. सोबतीला शिवसेना या पक्षाने देखील अनेकदा मराठीचा मुद्दा हाती घेतल्याचे दिसले. पुढच्या काळात २०१५ साली स्थापन झालेल्या मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) या बिगर-राजकीय लोकचळवळ संघटनेने अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे मराठीच्या मागणीचा रेटा लावून धरण्यात येत आहे.
त्यानंतर राज्यात मराठी भाषा भावणाची मागणी जोर धरू लागली. आणि हे मराठी भाषा भवन गिरगाव येथे उभारण्याचे निश्चित सुद्धा झाले. परंतु या गोष्टीला अनेक कालावधी लोटला तरी अजूनही मराठी भाषेच्या राज्यात मराठी भाषा भवन काही उभे राहिले नाही. राज्यात मराठी भाषा भवन काही झाले नाही पण सांताक्रूझ, वांद्रे भागात उत्तर भारतीय भवन मात्र नक्की बांधले गेले. नवी मुंबई आणि पनवेल भागात इतर भाषांची आणि राज्यांची भवने उभी राहिली. मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्षाचे आमदार आणि राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरात हिंदी भाषा भवन उभारण्याचा घाट घातला. त्यावरून खूप मोठा वाद उभा राहिला होता. या हिंदी भाषा भवनाच्या विरोधात मराठी एकीकरण समिती, अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी मोठा लढा दिला. आता हाच मराठी भाषा भवनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून त्याला विशेष कारण आहे. ते म्हणजे आता पुन्हा एका नगरसेवकाने महाराष्ट्र भवन/मराठी भवन मुंबईत व्हावे ही मागणी केली आहे. आणि ही मागणी करणारा नगरसेवक कोणी मराठी नसून एक अमराठी नगरसेवक आहे.

होय, तुम्ही खरं तेच वाचलात, चक्क एका अमराठी नगरसेवकाने मराठी तरुणांसाठी मुंबईत महाराष्ट्र भवन/मराठी भवन असायला हवे, अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली असून सध्या मुंबईत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मराठी तरुणांना उच्च शिक्षण, तांत्रिक कौशल्ये, शासनाच्या विविध स्पर्धापरीक्षांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका उत्तर भारतीय नगरसेवक ज्यांचे नाव डॉ. नितेश राजहंस सिंह आहे, यांनी ही मागणी केली आहे. भाजपचे नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांनी महाराष्ट्र भवन/मराठी भवनाची मागणी पत्र महापौर रितू तावडे यांना पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील मराठी युवकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळावी आणि महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये किमान दोन “महाराष्ट्र भवन/मराठी भवन” उभारण्यास तातडीने प्रशासकीय मंजूरी द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे.
डॉ. नितेश राजहंस सिंह हे भाजपचे स्वीकृत/नामनिर्देशित नगरसेवक असून विधान परिषदेचे आमदार राजहंस सिंह यांचे ते पुत्र आहेत. गेली अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय भाग घेत आहेत. महापौर रितू तावडे यांना लिहिलेल्या पत्रात नगरसेवक नितेश राजहंस सिंह यांनी असे म्हटले आहे की , मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे मुंबईत किमान दोन ठिकाणी महानगरपालिकेच्या उपलब्ध जागांचा उपयोग करून सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर या मराठी भवनमध्ये विविध उपक्रम सुरू करण्यात यावेत. मराठी भवनात आधुनिक सभागृह, संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह आणि सांस्कृतिक सभामंडप उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक नितेश राजहंस सिंह यांनी केली आहे.
आता यावर महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कोणता निर्णय घेतात ते पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
