राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन कागदपत्रांमध्ये खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव, पद वगळण्यात आल्याची मोठी बातमी आज समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. कारण २०१९ विधानसभा निवडणुकीपासून मतदार राजाने या गोष्टीचा प्रत्यय घेतला आहे. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेला घास उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करत हिरावून नेला. त्यानंतर अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी सुरत, गुवाहाटी प्रवास करत उद्धव ठाकरे यांची सत्ता, पक्ष आणि पक्षाचिन्ह ताब्यात घेतले आणि मुख्यमंत्री झाले. मग पुढे अजित पवार यांनी शरद परवारांची साथ सोडून ते महायुतीत सामील झाले. त्यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूळ नाव, चिन्ह मिळाले. त्यानंतर २८ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी मुंबईहून पुण्याला विमानाने जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यावेळी अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला, आणि अनेकांनी यात मोठ्या नेत्यांच्या नावाकडे बोट दाखवलं.

त्यानंतर लागलीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आणि त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या. अजित पवारांच्या मृत्यूला आज ३ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा संबंधित विमान कंपनी आणि मालक यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्याने त्यांचे पुतणे रोहित पवार दररोज प्रशासनाकडे आपला आवाज पोहोचवत असतात. त्यांनी यामागे अजित पवारांच्याच पक्षातील काही माणसाचा हात असल्याची शक्यता माध्यमांसमोर मांडली होती.

आता अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सगळं काही ठीक नसल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती आता समोर आली आहे. याला निमित्त ठरले आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी यादी. कारण या यादीतून सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष हे पद नमूद करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पद नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात आता जाणीवपूर्वक सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बाजूला करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबतीत प्रसार माध्यमांशी बोलताना पक्षाचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले की “आमच्या केंद्राच्या ऑफिस बेररमध्ये सुनील तटकरे यांचे नाव आहे, त्यामुळे ते आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पत्र राष्ट्रीय कार्यकारिणी बाबत आहे” असं विधान केलं आहे. आता याआधी सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसांत आता सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पद नमूद नसल्याने राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top