नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून एका वादळी कारकिर्दीची अखेर झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सत्यपाल मलिक यांना मे 2025 पासून दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे आणि मूत्रपिंड निकामी होण्याच्या गुंतागुंतीमुळे आयसीयूमध्ये ठेवण्यात होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे संविधानातील ‘कलम 370’ केंद्र सरकारने रद्द केले होते. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. मलिक राज्यपाल असताना पीडीपी आणि भाजप आघाडीची काश्मीरमध्ये सत्ता होती. भाजपने सत्तेबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तेची गणित जुळवण्यास सुरुवात झाली. मात्र, सत्तेचा दावा करण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी पीडीपीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. हा दावा फॅक्सने करण्यात आला होता. मात्र, राजभवनातील मशीन बंद असल्याच्या कारणाने हा दावा पोहचला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली. त्यानंतर मोठ्या घडामोडी झाल्या आणि कलम 370 हटवण्यात आले.