
भंडारा: मागील काही महिन्यांपासून विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या एका वक्तव्याने भाजप-शिवसेना शिंदे गटात जोरदार वादाची ठिणगी पडली आहे. आमदार फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवू असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार परिणय फुके यांनी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना मीच शिवसेनेचा बाप असल्याचे म्हटले. फुके यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला. फुके यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना स्टाइलने त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. परिणय फुके यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला जिल्हा बँक निवडणुकीत मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.