बई: राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगात आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यात जाण्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत. एका आठवड्याच्या अंतरात एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज (5 ऑगस्ट) रात्री उशिरा दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजता त्यांचे दिल्लीमध्ये आगमन होईल. त्यांच्या या दौऱ्याला राजकीय व प्रशासनिक पातळीवर विशेष महत्त्व दिलं जात आहे.

एका आठवड्यानंतर दुसरा दिल्ली दौरा…
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या दिवसभर दिल्लीतील विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसोबत इतरही काही बैठकांमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का, याकडेही राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधीच शिंदेंचा दौरा होत असल्याने आता टायमिंगवर चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र सदनमध्ये काही बैठका घेणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अद्याप त्यांच्या बैठकांची माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वीच शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर राज्यात मोठ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.