राज्यातील मंत्रिमंडळात मोठा बदल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी खात्याची जबाबदारी मनिकराव कोकाटे यांच्याकडून काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवली आहे. कोकाटेंचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या वर्तनावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून खाते काढून घेतले गेले.
दत्तात्रय भरणे यांनी खाते मिळाल्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी एका शेतकरी कुटुंबात वाढलो आहे. त्यामुळे कृषी खाते हे माझ्यासाठी केवळ एक पद नाही, तर लाखो शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. अजित पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
भरणेंच्या म्हणण्यानुसार, शेती क्षेत्रात नवे प्रयोग, शाश्वत विकास, सिंचन सुविधा वाढवणं, आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजनांवर भर देण्यात येईल. त्यांनी स्पष्ट केलं की, “कृषी हा केवळ व्यवसाय नाही, तर आपला आत्मा आहे.”

दुसरीकडे, मनिकराव कोकाटे यांनी झालेल्या कारवाईवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना कदाचित दुसरे खाते दिले जाईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कोकाटेंचा मोबाईलवर खेळताना व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता.
या बदलामुळे केवळ मंत्रीपदाचे हस्तांतरण झाले नाही, तर सामान्य शेतकऱ्याच्या आशा-आकांक्षांनाही दिशा मिळाली आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडून आता शेतकऱ्यांना अधिक सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे.