वॉशिंग्टन/गाझा: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये परतताच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होत आहेत. हमासविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी सर्व इस्रायली बंधकांची तातडीने सुटका करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

हमासची भूमिका आणि निर्णय: हमासच्या वरिष्ठ अधिकारी ताहिर अल-नुनु यांनी जाहीर केले की, गाझा युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व उर्वरित बंधकांची एकत्र सुटका केली जाईल. ट्रम्प यांच्या कडव्या भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
मध्यस्थांना सूचित करण्यात आले आहे की, हमास कराराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व बंधकांना सोडण्यास तयार आहे. मात्र, मृत बंधकांचे मृतदेह तिसऱ्या टप्प्यात परत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. युद्ध समाप्तीनंतर इस्रायलने आपले सैनिक गाझामधून माघारी बोलवण्याची आवश्यकता भासेल. त्यानंतर गाझाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होईल आणि मानवीय सहाय्य तिथे पोहोचेल.
इस्रायलकडे मृतदेह सुपूर्द करण्याची तयारी: इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हमास चार इस्रायली बंधकांचे मृतदेह परत करण्यास सहमती दर्शवली आहे. यामध्ये शिरी सिल्बरमॅन बिबास आणि त्यांची दोन लहान मुले एरियल व केफिर यांचा समावेश आहे. हमासने दावा केला आहे की, इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेहांच्या परतीनंतर इस्रायलमध्ये लष्करी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.