दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली असून, त्या आज शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानात दुपारी पार पडणार आहे. रेखा गुप्ता या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री ठरणार असून, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.

या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि आशिष शेलार हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.
कोण आहेत रेखा गुप्ता?
रेखा गुप्ता या हरियाणाच्या जिंद जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून त्यांनी २९,५९५ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शालेय जीवनातच झाली.
- १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव होत्या.
- १९९५-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठ छात्र संघाच्या सचिवपदी निवडल्या गेल्या.
- २००३-०४ मध्ये भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव होत्या.
- एप्रिल २००७ मध्ये उत्तरी पीतमपुरा प्रभागातून भाजपच्या नगरसेविका राहिल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भारतीय जनता पक्षाशी त्या अनेक वर्षांपासून जोडलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या राजकारणात कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.