बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी सांगितले की, ही भेट केवळ माणूसकीच्या नात्याने झाली होती.

धस यांचे स्पष्टीकरण – भेट गुप्त नव्हती
“धनंजय मुंडे यांची भेट शासकीय विश्रामगृहात झाली, आणि ती केवळ २० ते ३० मिनिटांची होती. मात्र, या भेटीला ४ तास असल्याचे का म्हटले जात आहे, हे बावनकुळे यांनाच विचारावे. रात्री साडे नऊ वाजता झालेली भेट गुप्त असू शकत नाही. अनेक लोक मुख्यमंत्र्यांनाही रात्री उशिरा भेटतात,” असे स्पष्टीकरण धस यांनी दिले.
“मी आदेशामुळे गेलो, पण संघर्ष सोडणार नाही”
“प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने मला भेटीसाठी जावे लागले. मुंडे यांचे काही वैद्यकीय उपचार झाले होते, म्हणून त्यांना भेटायला गेलो. मात्र, त्याचा माझ्या राजकीय भूमिकेशी काहीही संबंध नाही. माझ्या विश्वासार्हतेबाबत शंका असेल, तर बीड आणि परळीच्या जनतेला विचारा. मी ओपन-एअर थिएटर आहे, कोणीही मला दबावाखाली आणू शकत नाही,” असे धस म्हणाले.
“२० तारखेला सगळे घोटाळे उघड करणार”
“राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक कशी झाली, याचे पुरावे मी लवकरच सादर करणार आहे. कृषी साहित्याच्या वाढीव दरांबद्दल आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रे पाठवली आहेत. २० तारखेला सर्व घोटाळे बाहेर काढणार असून, कोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक कशी झाली, हेही स्पष्ट करणार आहे,” असे धस यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण – आरोपी अजून फरार
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक झाली असून, मुख्यमंत्री एक कठोर कारवाई करतील, असा विश्वास आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असून, त्याला लवकरच पकडले जाईल. या प्रकरणातील कट रचला कसा गेला, याचाही खुलासा करण्यात येईल,” असेही धस यांनी नमूद केले.