पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमान ‘इंडिया 1’ फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीहून पॅरिसकडे रवाना झाले. यावेळी, अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे या विमानाला पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करावा लागला. पाकिस्तानकडून यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली होती.

पाकिस्तानी हवाई हद्दीत 46 मिनिटे
मोदी यांचे विमान रात्री 11 वाजता पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेशले आणि जवळपास 46 मिनिटे ते या हद्दीत होते. हे विमान पाकिस्तानच्या शेखपुरा, हफीजाबाद, चकवाल आणि कोहाट या भागांमधून गेले. पाकिस्तानी माध्यमांमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
पूर्वीही अशा मार्गाचा वापर
याआधीही, ऑगस्ट 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करून यूक्रेनला गेले होते. यापूर्वी, पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याने 2019 मध्ये पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र, काही महिन्यांनी हे निर्बंध हटवण्यात आले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची खबरदारी
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा गट (SPG) कडे असते. त्यांना सतत कमांडोंच्या संरक्षणाखाली ठेवले जाते. हवाई प्रवासादरम्यान, SPG आणि भारतीय वायुदलाचे अधिकारी सतर्क राहतात. पंतप्रधानांचे विमान अन्य देशांच्या हद्दीत गेल्यावर त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असते. परंतु भारतीय सुरक्षा एजन्सी सतत संपर्कात राहून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. भारतीय वायुदलाचे विशेष विमान 24 तास पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असते.