राजधानी दिल्लीत मंत्री प्रतापराव जाधव यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली. मात्र, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी खासदारांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापूर्वी परवानगी घ्यावी, असे निर्देश दिले होते. या निर्देशांमुळे गटातील काही खासदारांमध्ये नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे. काही खासदारांनी, मंत्र्यांनी निमंत्रण दिल्यावर त्याला प्रतिसाद देण्यात गैर काहीच नसल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, या विषयावर विचारणा करताच खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. “जेवणासाठी आमंत्रण मिळाले तर जाऊ नये का?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच, “२००४ साली मी आणि प्रतापराव जाधव एकत्र आमदार होतो. मी फुटलेला नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटणे गैर आहे का?” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवाय, काही माध्यमांमध्ये चाललेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी, “ऑपरेशन टायगरसारख्या गोष्टी फेल आहेत, अशा अफवा पसरवणे हा मूर्खपणा आहे,” असेही ठणकावून सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे स्नेहभोजन प्रकरणावर नवा रंग चढला आहे.