राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तणाव वाढला आहे.

या वादाचं मुख्य कारण म्हणजे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली, आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, “प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जरा जपून वापरा. विश्वासघातकी वगैरे विशेषणे आम्ही ऐकून घेणार नाही. जेव्हा संघर्षाची वेळ येईल, तेव्हा शरद पवार साहेब तुमच्यापेक्षा अधिक आक्रमक असतील.”
शरद पवार यांची राजकीय उंची अद्वितीय
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना म्हटलं की, “पवार साहेबांचं राजकीय स्थान महाराष्ट्रात आणि देशभरात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या मनात सूडभावना किंवा द्वेष कधीच राहत नाही. काहीवेळा त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे आमच्या मनातही अस्वस्थता येते. मात्र, यालाच मोठेपणा म्हणतात.”
“ज्यांनी पक्ष पळवला, त्यांनी शिकावं!”
आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावरही टीका केली. त्यांनी सांगितलं की, “पवार साहेबांच्या विरोधात कट रचला गेला, पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं. तरीसुद्धा जेव्हा ते व्यासपीठावर त्या लोकांसोबत उभे राहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर राग किंवा असहिष्णुता दिसत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याने हे शिकायला हवं.”
“खोट्या केसेस करूनही पवार साहेब अढळ”
शरद पवार यांच्या राजकीय कणखरपणाबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, “खोट्या पोलिस केस करा, राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करा, निधी रोखा – काहीही करा, पण हे सगळं शरद पवारांना कधीच विचलित करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यासपीठावर ते जातील, त्यावर टीका करणं योग्य नाही.”
“राजकीय संवादाची गरज”
शेवटी, संजय राऊत यांना टोला लगावत आव्हाड म्हणाले, “राजकीय नेत्यांमध्ये संवाद वाढायला हवा. मात्र, तुम्ही तर विरोधकांची चटणीच करायला घेतली आहे. शरद पवार हे राजकीय सौजन्याचं उत्तम उदाहरण आहेत, आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे.”
राजकीय नेत्यांमधील हे वादळ किती काळ टिकणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.