नवी दिल्ली: सध्या देशभरात परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणावाची भावना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा 2025’ या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा कानमंत्र दिला.

भय वाटणाऱ्या विषयांची आधी तयारी करा
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या टेन्शनमध्ये न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगताना मोदी म्हणाले, “इतर विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले याचा विचार करण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या क्षमतांवर भर द्या. ज्या विषयांची भीती वाटते, त्यांची आधी तयारी करा आणि त्यावर आत्मविश्वास मिळवा.”
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले. तब्बल 3.30 कोटी विद्यार्थ्यांनी आणि 20.71 लाख शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. यातील निवडक 2500 प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजेरी लावली.
नेतृत्व गुण आणि संघभावना यांचे महत्त्व
विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर भर द्यावा, असा सल्ला देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “नेतृत्व म्हणजे जबाबदारीची जाणीव. टीम वर्क महत्त्वाचे असून, कुणालाही जबाबदारी दिल्यास त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. लोकांचा विश्वास मिळाल्यास तुमची नेतृत्वक्षमता वाढते.”
आव्हानांना धैर्याने सामोरे जा
मोदींनी विद्यार्थ्यांना आपल्या मर्यादा ओलांडून नवीन लक्ष्य गाठण्याचा संदेश दिला. ते म्हणाले, “जर मागील वेळी तुम्हाला 30 गुण मिळाले असतील, तर यावेळी 35 गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. ही स्वतःसाठी एक आव्हानात्मक संधी आहे, जी तुम्हाला अधिक सक्षम बनवेल.”
आरोग्य आणि वेळेचे नियोजन यांचे संतुलन ठेवा
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, “दिवसाचे नियोजन व्यवस्थित करा, वेळेचा योग्य उपयोग करा. उगाच वेळ वाया घालवू नका. योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि परीक्षेकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.”
या चर्चेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असून, परीक्षेबाबत सकारात्मक मानसिकता ठेवण्याचा संदेश पंतप्रधान मोदींनी दिला.