अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठा गहजब उडाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी लाच दिली होती, असे विधान करत त्यांनी इतिहासाबद्दल एक नवा वाद उभा केला. त्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान करत त्यांना ब्राह्मण असल्याचे सांगितले.

सोलापूरकर यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर संताप व्यक्त करत, “जो शिकलेला आणि ज्ञानी असेल, तो ब्राह्मण असेल, असे मनुवादी विचार आजही काहींच्या मनात रुजलेले आहेत. आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे,” असा इशारा दिला.
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “शिवराय आणि बाबासाहेबांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या बौद्धिक दिवाळखोर राहुल सोलापूरकरला तातडीने अटक करा आणि कठोर शासन करा,” अशी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी वाढली असून, त्यावर पुढे काय पाऊले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.