मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणाऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली, ज्यामुळे मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना जोर आला.

मात्र, या भेटीनंतर फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला अभिनंदनाचा फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना घरी येण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळेच आज ही भेट झाली.”
सुषमा अंधारे यांची टीका
या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका करत राज ठाकरेंवर निशाणा साधला.
“याचा फारसा परिणाम होणार नाही”
“राज ठाकरे यांची राजकीय उपयुक्तता कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्ये किंवा त्यांच्याकडे कोण जातं याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
“राज ठाकरे नेहमीच भाजपाच्या विरोधात बोलतात”
“महाराष्ट्रातील जनतेला तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनाही हे आता सरावाचं झालं आहे की, राज ठाकरे सुरुवातीला भाजपावर टीका करतात, पण निवडणुका जवळ आल्या की त्यांचा भाजपप्रेम उफाळून येतो,” असा घणाघात त्यांनी केला.
“राज ठाकरे यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही”
“राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे नेते आहेत. त्यांच्या राजकीय विचारसरणीला स्थैर्य नाही. त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्याशी भेट घेतली किंवा फडणवीस त्यांच्या घरी गेले, याने काही विशेष फरक पडत नाही,” असे अंधारे म्हणाल्या.
फडणवीस-ठाकरे भेटीचा अजेंडा काय?
या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती आणि यात कोणताही राजकीय अजेंडा नव्हता.
तसेच फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “ही केवळ औपचारिक भेट होती. आम्ही काही वेळ गप्पा मारल्या, नाश्ता केला आणि मग मी निघून गेलो,” असे त्यांनी सांगितले.
या भेटीमुळे भविष्यात भाजप-मनसे युतीबाबत तर्कवितर्क रंगू लागले असले तरी, अधिकृत पातळीवर यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.