काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवामागचं कारण स्पष्टपणे मांडलं आहे. त्यांनी मान्य केलं की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारचा अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता, ज्यामुळे प्रचारात गाफीलपणा झाला.

एका मुलाखतीत पाटील म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर आम्हाला वाटलं की विधानसभेतही सहज विजय मिळेल. पण आम्ही तयारीत कमी पडलो. त्यातच युती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर करत महिलांमध्ये थेट आर्थिक लाभ दिला. याचा निवडणुकांवर थेट परिणाम झाला.”
त्यांनी हे देखील सांगितलं की, “सीट वाटपाचं काम फार उशिरा पूर्ण झालं. त्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. भाजपने आमच्या बूथ स्तरावरील कमकुवत जागांवर लक्ष केंद्रित केलं आणि आम्ही गाफील राहिलो. हा आमचा मोठा भुलभुलैय्या ठरला.”
कोल्हापुरच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मिश्किल शैलीत म्हटलं की, “कोल्हापूरची बदनामी मिसळमुळे झाली, फक्त तिखट म्हणूनच ओळख निर्माण झाली आहे.” त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या आवडत्या मिसळ केंद्रांचाही उल्लेख केला – तंदूर, आहार, फडतरे आणि बावड्याची चव्हाण मिसळ त्यांना विशेष प्रिय आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णयही महायुतीच्या फायद्याचा ठरल्याचं त्यांनी नमूद केलं. “निवडणुका हरियाणासोबत घेण्यात आल्या असत्या, तर परिस्थिती वेगळी असती. आम्ही त्यावर वेळीच सुप्रीम कोर्टात दाद घेतली असती, तर लाडकी बहीण योजना जाहीर होण्यापूर्वी मतदान झालं असतं.”
शेवटी त्यांनी सांगितलं, “महाविकास आघाडी सत्तेत आली, तर योजना बंद होईल, असा गैरसमज महिलांमध्ये पसरवण्यात आला. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनी घेतला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.