धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षासाठी मोठी राजकीय खिंडार ठरणारी घटना समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रदेश सचिव प्रकाश आष्टे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप भालेराव आणि त्यांच्यासोबत 46 महत्त्वाचे स्थानिक पदाधिकारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.

मुंबईमध्ये भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात 20 नगरसेवक, 16 जिल्हा परिषद सदस्य, एक बाजार समितीचे सभापती, नऊ संचालक, तसेच दोन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेणार आहेत. लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशाचा नियोजन करण्यात आला आहे.
प्रवेशाआधी प्रकाश आष्टे आणि दिलीप भालेराव यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये प्रभावशाली होते, आणि त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, हा धक्का खास करून लातूर जिल्ह्यात वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घटना भाजपसाठी मोठा फायदा ठरणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाची ताकद प्रचंड वाढेल. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये भाजपला अधिक बळकटी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात या राजकीय घडामोडींचा स्थानिक निवडणुकांवर निश्चितच मोठा परिणाम होईल.