बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या प्रवेश कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे विविध चर्चा आणि अंदाजांना उधाण आले आहे.

७ ऑगस्ट रोजी वडवणी येथे भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत बॅनर्स लावण्यात आले आहेत.
या बॅनर्सवर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोटो झळकत आहेत. बाबरी मुंडे यांचे नावही बॅनरवर स्पष्टपणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, बीडमधील प्रमुख चेहरा समजले जाणारे धनंजय मुंडे यांचा फोटो या बॅनरवर कुठेही नाही.
धनंजय मुंडे हे काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कृषीखाते मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र त्या जागेवर दत्ता भरणे यांची निवड झाली. शिवाय त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कृषीखात्यातील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते, ज्यातून ते निर्दोष ठरले. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गड असलेल्या बीडमध्ये त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका बॅनरवरून असा राजकीय संदेश दिला जातो का, यावर चर्चा सुरु आहे. नेमकी ही चूक आहे की मुद्दाम केलेली दुर्लक्ष? हा प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील जनतेमध्ये आणि पक्षाच्या गोटात चर्चेचा विषय ठरत आहे.