मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (५ ऑगस्ट) धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला की, “अंतरवली सराटीत जी चूक झाली, ती पुन्हा होऊ नये. जर पुन्हा भानगड केली, तर त्याची किंमत फक्त तुमच्याच नाही, तर पंतप्रधान मोदींनाही मोजावी लागेल.”

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजातर्फे मोठं आंदोलन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर ही टीका झाली आहे. धाराशिवमध्ये झालेल्या बैठकीत जरांगे पाटलांनी विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला आणि या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
जरांगेंनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, “ही धमकी नाही, पण समजून सांगतो. आमच्या बहिणींना गुढघ्यांचे ऑपरेशन करावे लागले, अंगावर गोळ्या झेलाव्या लागल्या, ही पुन्हा वेळ मराठ्यांवर आणू नका. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. गोडीगुलाबीने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा.” फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका करत म्हटलं, “तुम्हाला भानगड करण्याची जुनी खोड आहे, ती थांबवा.”
त्यांनी असा इशारा देखील दिला की, जर आंदोलनाच्या दिवशी कोणताही राजकीय नेता उपस्थित नसेल, तर त्याला आगामी निवडणुकांमध्ये पाडा. “आई-बहिणींवर हात पडला, तर मराठे कोणत्याही टोकाला जातील, याचे गांभीर्य लक्षात घ्या,” असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला.
सध्या गावागावात चावडी बैठकींद्वारे आंदोलनाची तयारी सुरू आहे. मुंबईतील आंदोलन मराठा समाजाच्या एकजुटीचं प्रतिक ठरणार असून, जरांगे पाटलांनी स्पष्ट केले की आता वेळ आली आहे की समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी निर्णायक पाऊल उचलावं.