राज्यात आगामी महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेनंतर आता भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडेही स्वबळावर सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा महापौर भाजपचाच असायला हवा.

रविवारी कल्याणमधील महाजनवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात चव्हाण यांनी हा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती आणि त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवख्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि स्पष्टपणे बजावले की, “पक्षात प्रवेश करणे म्हणजे निवांत बसणे नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी तुम्ही प्रशासकीय यंत्रणेशी लढा द्यायला हवा.”
कल्याण-डोंबिवली शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर भाष्य करत चव्हाण म्हणाले की, विकास हवा असेल तर भाजपला सत्ता देणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपचा नगरसेवकच हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या विधानानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून शिवसेना-भाजप युतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता गाजवली आहे. मात्र, शिवसेना फोडल्यानंतर या भागात शिंदे गटाची पकड वाढल्याचे सांगितले जात होते. याच पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा दावा करत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका खासदार श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे भाजप जर येथे सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला, तर याचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. दोन्ही पक्षांमध्ये आता रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे.