भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करण्याची भूमिका कायम ठेवली असून, पाश्चिमात्य देशांच्या दबावाला न जुमानता ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास 7 दिवसांची मुदत दिली असून, अन्यथा 25 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑईल खरेदी सुरू ठेवली आहे. मे 2024 मध्ये भारताने दररोज 1.96 दशलक्ष बॅरल तेलाची आयात केली असून, ही संख्या मागील 10 महिन्यांतील सर्वोच्च आहे. सध्या रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार असून, भारताच्या एकूण आयातीपैकी 38 ते 40 टक्के तेल रशियाकडून येते.

फक्त तेलच नव्हे तर, भारत रशियाकडून कोळसा, शस्त्रास्त्र, आणि खतेसुद्धा आयात करतो. 2023 मध्ये भारताने 10.06 दशलक्ष मेट्रिक टन थर्मल कोळसा रशियाकडून घेतला, जो देशाच्या ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर गेल्या दोन दशकांत भारताने रशियाकडून अंदाजे 40 अब्ज डॉलर्सचे संरक्षण उपकरण खरेदी केले आहे, ज्यात S-400 डिफेन्स सिस्टिम, टँक, लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. तसेच, भारताच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेली नायट्रोजनवर आधारित रासायनिक खतेही रशिया पुरवतो.
अमेरिका आणि युरोपीय देश रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मर्यादा आणण्यासाठी रशियन तेल आणि गॅसच्या व्यापारावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की, “देशाचे ऊर्जा धोरण हे राष्ट्रहित आणि बाजारातील ताकद यावर आधारित असेल, कोणत्याही परकीय दबावात भारत येणार नाही.”
भारत आणि रशियाचे दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यास देशांतर्गत इंधन दरवाढ होण्याची शक्यता असून, ऊर्जा उत्पादनासाठी अधिक गुंतवणुकीची गरज भासेल.