पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटलं, “आम्हाला जे करायचं तेच करू. पण जेव्हा समजेल की महाराष्ट्राच्या गळ्याला नखं लागली आहेत, तेव्हा अंगावर येऊ.”

राज ठाकरे यांनी हिंदी भाषा आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून राज्यसरकारवर निशाणा साधला. “मुख्यमंत्री म्हणे लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत आहेत, पण महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी शिकवायची गरज त्यांना वाटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
तसंच, गुजरातचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह म्हणतात, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. मग आम्ही मराठीसाठी बोललो, तर संकुचित कसे? पंतप्रधान मोदींच्या काळात अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मग तुम्ही विचार करा, हे सगळं काय चाललंय?”
राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील जमिनींचा मुद्दाही उपस्थित केला. “रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. व्यवहार करणारे आपलेच आहेत. कुंपनच शेत खात आहे. बाहेरच्या राज्यातील लोक येत आहेत आणि उद्योगधंदे उभे राहत आहेत. मग भूमिपुत्रांचा विचार कोण करणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या भाषणातून त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा जोरात उपस्थित केला.
Ask ChatGPT