पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली दुटप्पी भूमिका आणि दहशतवादाला पाठिंबा देणारा चेहरा जगासमोर उघड केला आहे. अलीकडेच भारताच्या हवाई कारवाईनंतर पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यापैकी एका दहशतवाद्याच्या अंत्यविधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये काही पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि एक विशिष्ट व्यक्ती दिसत होती. त्या व्यक्तीबद्दल पाकिस्तानने स्पष्टपणे सांगितलं की तो केवळ एक धार्मिक मौलवी आहे, अतिरेकी नव्हे.

मात्र, या व्यक्तीची खरी ओळख पुढे आल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा खोटारडेपणा उजेडात आला. संशोधनातून उघड झालं की ही व्यक्ती हाफिज अब्दुल रऊफ आहे – जो लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर असून अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. पाकिस्तानने आधी दाखवलेलं आयडी कार्ड तपासलं असता, त्यावर नमूद असलेली जन्मतारीख आणि राष्ट्रीय ओळख क्रमांक रऊफशी पूर्णपणे जुळत होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा ‘तो मौलवी होता’ हा दावा पूर्णतः खोटा ठरला.
हाफिज अब्दुल रऊफची पार्श्वभूमी पाहिली तर तो लष्कर-ए-तोयबाशी 1999 पासून संबंधित असून, या संघटनेच्या ‘फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन’च्या माध्यमातून तो निधी संकलन आणि अतिरेकी कारवायांत सक्रिय होता. 2008 मधील मुंबईवरील हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. रऊफ हा हाफिज सईदचा निकटवर्तीय असून, त्याच्या आदेशानुसार कार्य करतो.
पाकिस्तानी लष्कराने केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या व्यक्तीला धार्मिक प्रचारक आणि सामान्य नागरिक म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्याचे आयडी कार्डही दाखवले होते, ज्यावर ‘वेल्फेअर विंग इंचार्ज – पीएमएमएल’ असं लिहिलेलं होतं. हे पाहून स्पष्ट होतं की रऊफ आपल्या दहशतवादी ओळखीला लपवण्यासाठी राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांच्या नावाचा वापर करत होता.
या प्रकारातून पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. एका घोषित दहशतवाद्याला सामान्य मौलवी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे पाकिस्तानकडून जगाला फसवण्याचा प्रयत्नच आहे. हे प्रकरण केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक पातळीवरही चिंतेचा विषय आहे. कारण पाकिस्तान केवळ दहशतवादाला खतपाणी घालत नाही, तर आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून त्या दहशतवाद्यांना संरक्षणही देतो.
या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की, पाकिस्तानच्या भूमीवरून उगम पावणारा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. जगातील सर्व देशांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.