देशभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आदिल राजा यांनी सोशल मीडियावर एक मोठा खुलासा करत या हल्ल्याचा सूत्रधार कोण होता हे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून घडवण्यात आला आहे.

आदिल राजा यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, “मी हे लिहितो आहे तेव्हा मला भारताचा एजंट ठरवलं जाईल, याची जाणीव आहे. मात्र सत्य लपवून ठेवलं जाऊ नये. माझ्याकडे मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे सांगतो की, असीम मुनीर यांनीच पहलगाममधील हल्ल्याचे आदेश दिले होते.”
राजा यांच्या मते, मुनीर यांनी परदेशात असलेल्या पाकिस्तानी कार्यकर्त्यांना बोलावून भडकाऊ भाषण केलं आणि त्यानंतर हा हिंसक कट रचण्यात आला. या हल्ल्यामागे त्यांचा उद्देश देशांतर्गत सुरू असलेल्या खटल्यांपासून स्वत:ला वाचवणे आणि राजकीय समीकरणं बदलणे हा होता.
हा दावा उघड झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदिल राजा हे पत्रकार असून सध्या ‘सोल्जर्स की सुनो’ या ब्लॉगद्वारे लष्कर व प्रशासनातील घडामोडींवर प्रकाश टाकतात. त्यांचं सोशल मीडियावर मोठं फॉलोअर्स बेस आहे – तब्बल १६ लाख लोक त्यांना फॉलो करतात. विशेष म्हणजे पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी हेही त्यांचे फॉलोअर आहेत.
राजा यांचा हा खुलासा सध्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. इम्रान समर्थकांचे म्हणणे आहे की, असीम मुनीर यांना पदावरून हटवून इम्रान खान यांना पुन्हा सत्तेत आणल्यासच देशात स्थिरता येऊ शकते.
राजा यांच्या मते, मुनीर यांची धोरणं पाकिस्तानसाठी धोकादायक ठरत आहेत आणि जर त्यांना त्वरित हटवले गेले नाही, तर देश अधिक अराजकतेकडे झुकू शकतो. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आवाहन केलं आहे की, देशाच्या हितासाठी त्यांनी त्वरीत निर्णय घ्यावा.
संपूर्ण देश पहलगाममधील या अमानवी हल्ल्यामुळे शोकसागरात बुडालेला असताना, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचाही चिंतेचा विषय ठरत आहे. आदिल राजा यांचा दावा कितपत सत्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण त्यांच्या विधानाने पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.