जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात २२ एप्रिल रोजी दुपारी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला, ज्यात दुर्दैवाने २६ पर्यटकांचा जीव गेला. या गंभीर घटनेनंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश मिळाले आहेत.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. किनाऱ्यालगत येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून, कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ लँडिंग पॉईंट्सवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. किनारपट्टीवर चौकशी मोहीम आणि गस्त सुरू असून, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली आहे.
मुंबई आणि पुणे शहरातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली आहे. सर्व वरिष्ठ निरीक्षक व क्षेत्रीय पोलिस उपायुक्तांना (डीसीपी) आपल्या विभागात अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील इमारती व पर्यटन स्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संशयित व्यक्तींची तपासणी करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे आणि नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी पर्यटन स्थळे आणि महत्त्वाच्या सार्वजनिक जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. अनंतनाग आणि आसपासच्या भागांमध्ये बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, अनेक ठिकाणी दुकानं, बाजारपेठा आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही भागांमध्ये संचारबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
संपूर्ण देशात निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.