मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे आणि संपूर्ण राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष या निवडणुकीकडे वळले आहे. महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय नेते जोरदारपणे मत व्यक्त करू लागले आहेत.

नेहमीप्रमाणे, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मुंबईतील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे आरोप होत असतात. मात्र यावेळी भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंवर थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना “लँड स्कॅमचा बादशहा” असे संबोधले आहे.
गरवारे क्लब येथे नुकतीच भाजपाची कार्यशाळा पार पडली. वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेलारांनी भाषण करताना उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. “मुंबईतील प्रत्येक जमीन घोटाळ्याच्या मुळाशी उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या डोक्यात कायम जमीन आणि जमीन घोटाळ्याचं राजकारण चालू असतं,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
यावर पुढे बोलताना शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे सतत भाजपावर आरोप करतात की आम्ही जमिनी घेतो आणि अदाणी-अंबानी यांना देतो. मात्र मुंबईतल्या जमिनींचा गैरवापर झालाय तो त्यांच्या सत्ताकाळातच. मुंबईतील एका चौरस फुटाची किंमत एक लाख रुपये आहे आणि अशा मौल्यवान जमिनी बिल्डरांना देण्याचं पाप उद्धव ठाकरेंनीच केलं आहे.”
शेलार यांनी आणखी पुढे जाऊन ठामपणे सांगितले, “आज उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न विचारत आहेत. मात्र मी इथं स्पष्ट करतो की, भाजपाच्या कार्यकाळात कोणतीही जमीन बिल्डरांच्या घशात जाणार नाही.”
मुंबई महापालिकेची सत्ता राखण्यासाठी सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शेलारांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबईतील जमिनींचा गैरव्यवहार आणि राजकारणाचा एक नवा वादंग यानिमित्ताने समोर आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप आणि प्रत्युत्तरांच्या फैरी अधिकच तीव्र होणार, यात शंका नाही.