महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बैठकीवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या बैठकीवर भाष्य करताना शेतकरी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.

लक्ष्मण हाके म्हणाले, “शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यात फारसा फरक नाही. ही दोन स्वतंत्र पक्ष नाहीत, ते एकच आहेत. पवार कुटुंबीय कधीही वेगळे नव्हते आणि महाराष्ट्राच्या जनतेला गोंधळात टाकण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.” हाके यांनी असेही सांगितले की, पवार कुटुंबीय कधीही एखादी चळवळ उभी करत नाहीत, ते नेहमी सत्तेतच राहिले आहेत आणि भविष्यातही ते सत्तेपासून फार लांब राहू शकणार नाहीत.
यावेळी बोलताना हाके यांनी महाविकास आघाडीत सुरू असलेल्या घडामोडींवरही भाष्य केले. त्यांनी असा गौप्यस्फोट केला की, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही नेते कधीच सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत. त्यांनी दावा केला की, छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून ती जागा आधीच रोहित पवार किंवा जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवली गेली होती.
हाके यांनी रोहित पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, “रोहित पवारांनी जनतेत उतरून काम करावे. विरोधी पक्षात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. जर खरोखर लोकनेते व्हायचे असेल तर सामान्य लोकांच्या प्रश्नांशी जोडले गेले पाहिजे.”
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आणखी एका चर्चेवर हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना हाके म्हणाले, “राज आणि उद्धव यांनी एकत्र यायला हवे. राज्यातील विरोधी पक्षात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी त्यांची एकजूट महत्त्वाची ठरेल.”
लक्ष्मण हाके यांच्या या प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरल्या असून, राज्याच्या राजकीय भवितव्यावर त्यांचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.