सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या दिलजमाईची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, पवार कुटुंबीय नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देतात आणि राजकारणाला दुय्यम स्थान देतात. त्यामुळे भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको, असं त्यांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंब सण-उत्सवाच्या काळात एकत्र येतं, त्यामुळे त्यांच्यातील कौटुंबिक नातं कायम मजबूत राहिलं आहे, असेही ते म्हणाले.
शिरसाट पुढे म्हणाले की, पवार कुटुंबाने यापूर्वीही सांगितलं आहे की ते राजकारणाला बाजूला ठेवून कुटुंबाला अग्रक्रम देतात. त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही घडू शकतं, त्यामुळे अशा घडामोडींवर कोणताही निश्चित अंदाज बांधणं कठीण आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
याच दरम्यान, खासदार रोहित पवार यांनीही थेट अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र यावं, असं आवाहन केलं आहे. त्यांनी दिलेल्या या सूचनेमुळे पवार कुटुंबातील अंतर्गत घडामोडी आणि भविष्यातील राजकीय दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये दूरदृष्टीने काहीतरी जुळवाजुळव सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्यातील सत्ता समिकरणं नेहमीच बदलती राहिली आहेत. पवार घराण्याचं सत्तेशी असलेलं नातं देखील सर्वज्ञात आहे. त्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेण्याची शक्यता निर्माण करू शकतं.