महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रीकरणावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर या घडामोडीचं विश्लेषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना दिली आहे.

राज ठाकरे सध्या परदेशात असून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संभाव्य युतीबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “ही एक गंभीर बाब आहे. साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या विषयावर कुणीही वक्तव्य करू नये. राज साहेब परतल्यावरच ते स्वतः या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करतील.” राज ठाकरे २९ एप्रिलला भारतात परत येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या हितासाठी आपसातील वाद दुर्लक्षित करायला हवेत आणि एकत्र यायला काहीही हरकत नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, पण युतीसाठी काही अटी मांडल्या आहेत. त्यामुळे या दोन चुलत बंधूंचं एकत्र येणं खरंच शक्य होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेसोबतची मैत्री संपल्याचं जाहीर केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन म्हणाले, “ही बाब अत्यंत दु:खद आहे. आमचा मनसे परिवार शोकाकुल झाला आहे. साहेब सध्या देशाबाहेर आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरातील पाळीव प्राणीही अस्वस्थ झाले आहेत.” त्यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका करताना म्हटलं, “राज साहेब हे मैत्रीच्या जगातले राजे आहेत. एकेकाळी जिव्हाळ्याचं नातं असलेला माणूस आज त्यांच्याशी असलेली मैत्री संपली असं म्हणतो, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.”
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे परत आल्यानंतर त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होऊ शकतात, अशी चर्चा आता जोमात आहे.