महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव बाजूला ठेवून दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेने वातावरण तापले आहे. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जुन्या वादांना बाजूला ठेवून पुढे जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दर्शवली आहे. त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात म्हटलं, “आमच्यातील भांडणं आणि वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे.” त्यांच्या या भाषणाने राजकीय चर्चांना नवा जोर मिळवून दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे यांनीही असं म्हटलं की, “मी जुन्या भांडणांना विसरायला तयार आहे. सर्व मराठी बांधवांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येऊ.”
या चर्चेमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि काही मनसे कार्यकर्त्यांनी या संभाव्य युतीचं स्वागत केलं आहे. त्यांना वाटते की मराठी अस्मितेसाठी एकत्रित लढणं आजच्या घडीला महत्त्वाचं आहे.
मात्र, मनसेतील काही वरिष्ठ नेते या युतीच्या चर्चांवर नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः मनसे नेते अमेय खोपकर यांनी थेट ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “अशी अभद्र युती होऊ नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी जर खरंच राजकीय एकत्रिततेचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात. अनेक वर्षांच्या कटुतेनंतर हा मैत्रीचा हात पुढे केला जातोय, हे काहींना आशादायक वाटत असलं तरी काही समर्थक आणि नेते अजूनही साशंक आहेत.
महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले आहेत की, जर मराठी हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय झाला तर तो स्वागतार्ह असेल.
आता सर्वांचं लक्ष आगामी काळात या चर्चांना काय दिशा मिळते याकडे लागलं आहे. मनसे आणि ठाकरे गट यांची युती प्रत्यक्षात येते का, की अंतर्गत विरोधामुळे हा प्रस्ताव अयशस्वी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.