राज्यात मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. विशेषतः सक्तीच्या हिंदी भाषावापराच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत मराठीचा आग्रह धरला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुंबईमध्ये मराठीचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. घाटकोपरसारख्या परिसरांमध्ये प्रत्येकाने मराठीच बोलली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्यांनी फडणवीसांना टोचून विचारले, “तुमच्या जोशी का माशी आले होते ना खाली? त्यांना तिथे आधी मराठी सक्तीची करून दाखवा, मग आम्ही पाहू हिंदीबद्दल काय करायचं ते!” असे म्हणत ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठवली.
मराठी प्रेमाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचं हिंदुत्व हे केवळ धर्म पाळणारे नाही, तर मातृभाषेचा अभिमान बाळगणारेही आहे. आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, पण हिंदीची सक्ती मात्र खपवून घेणार नाही.” महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी शिकायलाच हवी. “तामिळनाडूत कोण हिंदीची सक्ती करतो? तिथे तमिळ भाषेला सर्वोच्च स्थान आहे. मग महाराष्ट्रातच मराठीला दुय्यम का ठरवायचं?” असा सवालही त्यांनी सरकारला केला. शिवसेना सर्व भाषिकांना आपलेसे करते, मात्र मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.
राज्याच्या शैक्षणिक धोरणावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. “माझे वडील आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी शाळा सोडली होती, पण तरीही त्यांनी उत्तम शिक्षण घेतले. शिक्षणासाठी सक्तीची भाषा नसते, जिथे जिद्द आहे तिथे शिक्षण घडते,” असे सांगताना त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
त्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “केवळ गद्दारीचं प्रमाणपत्र घेऊन मंत्रीपद मिळालं तरी कामाचं काही होत नाही. शिक्षणाच्या नावाखाली ज्या लोकांना पदं दिली आहेत, ते खरोखर पात्र आहेत का? हे जनतेने तपासलं पाहिजे.”
एकूणच, महाराष्ट्रात मराठीच्या अस्मितेचा आवाज पुन्हा बुलंद झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि अस्तित्वासाठी शिवसेना कायम लढत राहणार आहे.