राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडेच हिंदी भाषा आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनावर भाष्य करताना ते म्हणाले की, राज्याची आर्थिक घडी चांगल्या स्थितीत आहे आणि सरकारचे नियोजन व्यवस्थित सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी मिळण्यात थोडा विलंब झाला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मागील बॅकलॉग पूर्णपणे भरून काढला आहे, असे महाजन यांनी सांगितले.

यावेळी हिंदी भाषेच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या विरोधावरही महाजनांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने हिंदी शिकणे आवश्यक आहे. मराठीच्या प्रसारासाठी आपण प्रयत्नशील आहोतच, पण सोबत हिंदी भाषा शिकण्याचेही तितकेच महत्त्व आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र ज्या देशात आपण राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा समजून हिंदीचीही ओळख असली पाहिजे.”
राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, गिरीश महाजन म्हणाले, “राज ठाकरे काय म्हणाले ते मी ऐकलेले नाही, परंतु माझे स्पष्ट मत आहे की हिंदी भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे.”
तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजनांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या भाषणाच्या प्रसारणावर जोरदार आक्षेप घेतला. महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचा केविलवाणा प्रकार चालू आहे. टीआरपीसाठी त्यांनी बाळासाहेबांची विचारसरणी बाजूला ठेवली आहे. आज त्यांच्या सोबत फारसे लोक उरलेले नाहीत. लवकरच नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांची संख्या किती आहे ते स्पष्ट होईल.”
महाजनांनी असा आरोप केला की, उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या मोहामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शिवसेनेच्या मूळ विचारधारेचे नुकसान झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात भाषण प्रसारित करणे हा एका थट्टेचा भाग असल्याचे ते म्हणाले. “स्वतःच्या आवाजात बोला, बाळासाहेबांना तुमच्या वागण्याचा किती त्रास झाला असता याचा विचार करा,” असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
गिरीश महाजन यांच्या या तीव्र टीकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हिंदी भाषा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या वारशावर चर्चा रंगली आहे.