सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषांबाबत वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपले मत मांडले आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, “मराठी ही आपल्या राज्याची मातृभाषा आहे. तिच्याबाबत कोणालाही शंका नाही. प्रत्येक राज्याला आपली भाषा असते आणि तिच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा असतो. त्यामुळे मराठी टिकवणं आपली जबाबदारी आहे.

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, जो अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यांनी म्हटले, “दिल्लीमध्ये ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित होती, पण अखेर एनडीए सरकार आणि मोदी साहेबांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय झाला.”
तसेच त्यांनी सांगितले की, मराठी भाषा भवन मरीन ड्राइव्ह परिसरात उभारले जाणार आहे. “त्यासाठी आवश्यक सर्व नियोजन पूर्ण झाले असून निधीच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांनी पुढे म्हटले की, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि हिंदी देखील देशभरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यामुळे या दोन्ही भाषांचं महत्त्व आहे, पण मातृभाषेला नेहमीच सर्वोच्च स्थान असायला हवं.
मराठी विरुद्ध हिंदी वादावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली की, “सध्या काही लोकांना कामधंदा नाही म्हणून असे वाद उकरून काढले जात आहेत. यामध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी राज्याच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करणं अधिक गरजेचं आहे.”
राजकीय वादावर बोलताना त्यांनी म्हटले की, “आजच्या घडीला काही राजकीय पक्षांकडे मुद्दे राहिलेले नाहीत. उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, तापमान झपाट्याने वाढतेय, त्यामुळे जास्त महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष देणं आवश्यक आहे.”
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले की, “सध्या त्यांच्या संदर्भात सीआयडी चौकशी आणि पोलीस तपास सुरू आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आलं आहे. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून योग्य निर्णय घेतील.” त्यांनी स्पष्ट केलं की कोणतीही घाई करून निर्णय घेणार नाहीत आणि सर्व तपासानंतरच योग्य पाऊल उचललं जाईल.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी भर दिला. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “कोणत्याही गटाचा वा पक्षाचा सदस्य असो, जर दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे.”
एकंदरीत, अजित पवार यांनी मराठी भाषेबाबत अभिमान व्यक्त करत, वाद निर्माण करणाऱ्यांना थेट इशारा दिला आणि राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा, असे आवाहन केले.