महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वसामान्यपणे रोखठोक स्वभावासाठी आणि शिस्तप्रियतेसाठी ओळखलं जातं. मात्र नुकत्याच त्यांच्या एका व्हिडिओने त्यांच्या संवेदनशील आणि हळव्या स्वभावाची झलक सर्वांसमोर आणली आहे. दौऱ्याच्या वेळेत थोडीशी विश्रांती घेत त्यांनी एका चहाच्या टपरीवर चहा घेतला आणि टपरी चालकाच्या संघर्षाची कथा ऐकली.

जामखेडच्या दौऱ्यावर असताना अजितदादांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून काही क्षण टपरीवर घालवले. तिथं त्यांनी बंडू ढवळे या चहा विक्रेत्याशी संवाद साधला. या साध्याशा संवादात त्यांना समजलं की ढवळे यांनी प्रचंड कष्ट करून आपल्या मुलाला एमबीबीएस डॉक्टर बनवलं आहे. स्वतः झिजत झिजत त्यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख दिले.
या अनुभवाने भारावून जाऊन अजितदादांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, “काल जामखेड दौऱ्यावर असताना एका छोट्याशा टपरीवर थांबून चहा घेतला. हा चहा फक्त चवदार नव्हता, तर समाधान आणि आनंदाने भरलेला होता. बंडू ढवळे यांच्या कथेने मन भारावून गेलं. अपार कष्ट करून त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं. त्यांच्या चिकाटीला आणि मेहनतीला माझा सलाम!”
या पोस्टमध्ये अजितदादांनी “कष्ट बापाचे, यश लेकाचे” असा मार्मिक संदेश दिला. त्यांनी बापाच्या संघर्षाला आणि मुलाच्या यशाला सलाम करत ढवळे यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, ढवळे यांनी आपल्या कष्टांनी मुलाच्या जीवनाला आकार दिला आणि त्याचं भविष्य उज्वल केलं.
अजित पवारांनी शेअर केलेला हा प्रसंग सध्या राज्यभर गाजतो आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या या हळव्या बाजूचं कौतुक केलं आहे. काहींनी तर म्हटलं की, “अजितदादांचा हा हळवा कोपरा खरोखरच मनाला भिडणारा आहे.”
ही ‘चाय पे चर्चा’ केवळ चहा पिण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती एका संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ऐकण्याचा अनमोल अनुभव ठरला. या साध्या संवादातून समाजातील प्रामाणिक कष्टकरी वर्गाची संघर्षमय आणि प्रेरणादायक बाजू समोर आली.
अजित पवारांचा हा छोटासा प्रसंग दाखवतो की, समाजाच्या तळागाळातही किती मोठं स्वप्न उराशी बाळगून जगणारे लोक आहेत, आणि त्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांच्या अथक मेहनतीचा मोठा वाटा असतो.