महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या भविष्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलवरील विशेष मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर प्रगतीच्या नावाखाली मराठी माणसाचे अस्तित्वच धोक्यात येत असेल, तर अशी प्रगती स्वीकारार्ह नाही.

राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने समाधान मानण्यात अर्थ नाही. केवळ भाषा दिन साजरा करून किंवा अभिजाततेचा सन्मान मिळवून मराठी टिकणार नाही. शासनकर्ते आणि राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मराठीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, मराठी समाजाच्या अस्तित्वावर घाला येईल, असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हर्स, पूल आणि विकास प्रकल्प उभे राहत आहेत, हे जरी डोळ्यांना आकर्षक वाटत असले तरी यामध्ये जर स्थानिक मराठी माणसाचे अस्तित्व कमी होत असेल, तर ही प्रगती नकोच. केवळ बाह्य विकासासाठी स्थानिक संस्कृती आणि भाषा धुळीस मिळाल्या तर त्या प्रगतीचे काहीच अर्थ उरत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणे अत्यंत गरजेचे आहे, यावरही राज ठाकरे यांनी भर दिला. आज अनेक नामांकित शाळांमध्ये विदेशी इतिहास शिकवला जातो, पण आपल्या मातृभूमीतील थोर इतिहास पुरुषांचा गौरव सांगणं दुर्लक्षित केलं जातं. फ्रेंच क्रांतीचे धडे दिले जातात, पण शिवरायांचा अभिमान कसा घ्यायचा, हे शिकवलं जात नाही, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त सांगणं पुरेसं नाही, तर त्या इतिहासातून विद्यार्थ्यांना बोध कसा घ्यायचा, हे शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रात असा बदल घडवणं अत्यंत गरजेचं असून मराठी संस्कृतीचा अभिमान जपला गेला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही दिलखुलास आणि ठाम भूमिका मांडणारी मुलाखत लवकरच महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.