भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या एका विधानावरून प्रसिद्ध कीर्तनकार भागचंद महाराज झांजे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारळी सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नामदेव शास्त्रींनी भगवान बाबांच्या काठीबद्दल केलेल्या विधानावरून हा वाद उफाळला आहे.

नामदेव शास्त्री म्हणाले होते की, “भगवान बाबा जेव्हा काठीने मारतात, तेव्हा आवाजही येत नाही.” तसेच त्यांनी असेही सांगितले की, “आम्ही मराठा समाजातील ५० मुलांचे संगोपन करतो.” या विधानांवर प्रतिक्रिया देताना भागचंद महाराजांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
भागचंद महाराज म्हणाले की, “भगवान बाबांच्या चरित्रात कुठेही त्यांच्या काठीने कोणाला इजा झाल्याचा उल्लेख नाही. आजही हजारो भक्त भगवान बाबांना निस्सीम श्रद्धेने पूजतात. त्यांच्या कृपेने अनगिनत भक्तांचे जीवन परिवर्तन झाले आहे.” त्यामुळे भगवान बाबांबद्दल असे विधान करणे योग्य नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
याशिवाय, भागचंद महाराजांनी जातीविषयक मुद्यावरही नामदेव शास्त्रींना जाब विचारला. “आम्ही २०० मुले सांभाळतो, त्यापैकी ५० मुले मराठा समाजातील आहेत. असे सांगत तुम्ही जातीवर आधारित उपकार सांगता. संत परंपरेत कधीही जातपात विचारली जात नाही. आळंदी सारख्या ठिकाणी वारकरी संप्रदायात रोज नवनवीन मुले घडतात, तिथे कधी कोणाची जात विचारली का?*”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही ५० मुलांचे संगोपन करत असल्याचा उल्लेख करून जातीचा मुद्दा उचलता, तर खरा जातीवाद कोण करत आहे? संत भगवान बाबांनी कधीच कोणाच्या जातीचा, धर्माचा भेद केला नाही. ते सर्व मानवतेच्या कल्याणासाठी कार्यरत होते. मग, इतक्या उंचीवरच्या व्यक्तीकडून असे जातीय विधान अपेक्षित नाही.*”
दरम्यान, शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे झालेल्या नारळी सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी नामदेव शास्त्रींनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते. त्यावेळी भगवान बाबांच्या काठीचा उल्लेख करत त्यांनी भगवानगडाशी छेडछाड न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या काठीवरील विधानाचा संदर्भ घेऊन भागचंद महाराजांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
भागचंद महाराज झांजे यांच्या या भाष्यामुळे भगवानगडाशी संबंधित वातावरण तापले असून, या वादावर पुढे काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.