मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत मराठी कुटुंबाला केवळ मांसाहार करत असल्याच्या कारणावरून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी ठाणे आणि कल्याणसारख्या ठिकाणीही मराठी माणसांबाबत भेदभावाचे प्रकार घडले होते. घाटकोपरच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी-अमराठी वादाला उधाण आलं आहे.

घटनेनुसार, घाटकोपरच्या एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या एका मराठी कुटुंबावर अन्याय करण्यात आला. या कुटुंबावर फक्त मच्छी-मटण खात असल्याच्या कारणावरून टीका करण्यात आली. सोसायटीतील एका व्यक्तीने, ज्याचे आडनाव शाह असल्याचे सांगितले जाते, या कुटुंबावर जातीवाचक टीका करत “तुम मराठी लोक घाणेरडे असता, मच्छी-मटण खाता” असे अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आहे.
ही माहिती समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. मनसैनिकांनी त्यांच्या खास रोखठोक शैलीत सोसायटीतील काही सदस्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं. “सोसायटीतील कार्यक्रमात फक्त एका विशिष्ट समाजाच्या लोकांनीच भाग घ्यायचा का? मराठी लोकांना वगळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?” असा परखड सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला.
तसेच, सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मराठी कुटुंबांविरोधात मतदान घेण्यात आले होते, यावरही मनसेने संताप व्यक्त केला. “जेव्हा मराठी लोकांविरोधात पोल घेतला गेला, तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी का विरोध केला नाही?” असा जाहीर सवाल विचारण्यात आला. यावेळी काही अपमानास्पद भाषाही वापरल्याचे वृत्त आहे.
या साऱ्या प्रकरणामुळे संबंधित सोसायटीतील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. वाद उफाळल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे घाटकोपर परिसरात मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईसारख्या बहुवांशिक शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी एकमेकांचा सन्मान राखायला हवा, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे. विशेषतः सामाजिक एकोपा राखण्यासाठी अशा भेदभावपूर्ण वागणुकीला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव सर्व स्तरांना झाली पाहिजे.