बीड जिल्ह्यात संत भगवानबाबा गडावर पार पडणाऱ्या फिरत्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ गुरुवारी पार पडतोय. या विशेष कार्यक्रमात एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे, एकाच व्यासपीठावर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही काळात तीव्र राजकीय वाद होत असतानाही, भगवानबाबांच्या कार्यक्रमात ते एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या भेटीतून सलोखा साधला जाईल का, याची चर्चा जोरात सुरू आहे.

या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, संत भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ दरवर्षी वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित केला जातो. यंदा त्यांच्या मतदारसंघातील गावाला हा मान मिळाला असून, गेल्या सात दिवसांपासून हा भव्य उत्सव सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी एकत्र आले आहेत. भगवानबाबांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे धस यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमातील सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना धस म्हणाले, “भगवानबाबांच्या कार्यक्रमात राजकीय भेदभावाला थारा नाही. भगवानबाबांना मानणारे प्रत्येकजण येथे येणारच. त्यामुळे धनंजय मुंडेही येतील, यात काही आश्चर्य नाही. भगवानबाबांच्या नारळी सप्ताहात सर्वच पक्षांच्या लोकांनी सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. येथे राजकारणासाठी काहीच जागा नाही.”
धस यांनी आणखी स्पष्ट केले की, “या मंचावर भगवानबाबा आणि नामदेव शास्त्री यांचे वर्चस्व आहे. माझे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय मतभेद आणि संघर्ष हा बाहेरच राहील. येथे आम्ही केवळ भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत.”
या उत्सवामुळे पिंपळनेर गावात जणू काही कुंभमेळ्याचेच स्वरूप आले आहे. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र येत नारळी सप्ताह मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला आहे. सहाव्या दिवशी गावकऱ्यांनी तब्बल १५ क्विंटल खव्यापासून गुलाबजाम तयार केले, ज्याचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांनीही स्वयंसेवक म्हणून कार्य करून धार्मिक सौहार्दाचे सुंदर उदाहरण घडवले.
या कार्यक्रमात जात, धर्म किंवा पक्षीय मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात, हीच भगवानबाबांच्या शिकवणीची खरी झलक या उत्सवातून पाहायला मिळते.