नागपूरमध्ये अलीकडील हिंसाचाराची धग अजूनही शमलेली नाही. औरंगजेबाच्या कबरप्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावातून आता राजकीय संघर्षही चांगलाच पेटला आहे. विशेष म्हणजे हा वाद आता केवळ जातीप्रश्न किंवा प्रतिनिधीत्वापुरता मर्यादित राहिला नसून, थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये भाजपचे नेते संदीप जोशी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे.

सुरुवात झाली ती विजय वडेट्टीवार यांच्या मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेने. वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर लुटारूंची टोळी असा आरोप केल्याने वातावरण ढवळून निघाले. त्याला प्रत्युत्तर देताना संदीप जोशी यांनी, “आपली संस्कृती सांगते की मृत व्यक्तीविषयी आदराने बोलावे. मंगेशकर कुटुंबावर अशा प्रकारे आरोप करणे अत्यंत लाजिरवाणे आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी वडेट्टीवार यांना चांगलाच धडा शिकवला असता,” अशी तिखट प्रतिक्रिया दिली.
लता मंगेशकर यांच्या कलेने पंडित नेहरूंपासून संपूर्ण देश भारावला होता, असे सांगून जोशी यांनी वडेट्टीवार यांच्या विधानांची कठोर शब्दांत निंदा केली. लतादीदींच्या दानशूरतेचा उल्लेख करत, वडेट्टीवार यांनी जर दान केले असेल तर त्याचा पुरावा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व संघावर निशाणा साधला. सपकाळ यांनी संघाच्या प्रमुखपदी दलित, मुस्लिम किंवा महिला नेमण्याची मागणी करत भाजपवर जातीवादी वृत्तीचा आरोप केला. त्यास उत्तर देताना संदीप जोशी यांनी सपकाळांवर जोरदार पलटवार केला.
“संघ कार्यालयाचे कुलूप तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणाच्याही अंगात हिंमत नाही. सपकाळ यांच्या अंगातही ती ताकद नाही,” असे जोशी म्हणाले. त्यांनी सपकाळ यांच्यावर थेट व्यक्तिगत टीका केली आणि जर त्यांच्यात हिंमत असेल तर कृतीतून दाखवावे, असे खुले आव्हान दिले.
संदीप जोशी यांनी सपकाळ यांच्यावर मुस्लिम समाजाला चिथावणी देत असल्याचा आरोपही केला. जर सपकाळ यांना खरोखरच हिंसाचाराच्या शक्यता माहित होत्या, तर त्यांनी गुप्तचर यंत्रणेला माहिती का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या साऱ्या वादामुळे नागपूरचे वातावरण अजूनही तापलेले आहे. व्यक्तिशः टीकाटिप्पणी आणि आव्हानांची देवाणघेवाण यामुळे राजकीय संघर्षाचे स्वरूप अधिक आक्रमक होत चालले आहे. पुढे हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.