नाशिकमध्ये आयोजित ‘निर्धार मेळावा’ या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपला त्यांनी सोडलं असलं तरी हिंदुत्व कधीच सोडलं नाही आणि मेलो तरी ते सोडणार नाही. मात्र, भाजप जे हिंदुत्व मांडत आहे, ते संकुचित आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका त्यांनी केली.

ठाकरे म्हणाले की, हिंदुत्व म्हणजे केवळ धार्मिक घोषणाबाजी नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिलं होतं की हिंदूंमध्ये आत्मभान जागृत करून त्यांना मतदानाच्या माध्यमातून ताकद देता येते. मात्र, भाजप आज केवळ हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. “हिंदूंना पेटवा आणि मुस्लिमांवर दगड फेका किंवा उलट करा – भाजपचा हा सत्तेसाठीचा खेळ आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. तरीही भाजपने या मुद्द्यावरून राजकीय फायद्यासाठी अपप्रचार चालवला. तसेच त्यांनी विचारलं की, भाजपने एकदातरी स्पष्ट करावं की त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?
ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी, ही लोकशाहीची खरी गरज आहे. मात्र, भाजप या तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेचा विश्वास डळमळीत करत आहे.
भाजपच्या कथित हिंदुत्वाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्हीही म्हणतो. पण त्याच वेळी जय शिवराय देखील बोलायला हवा. कारण आमचं हिंदुत्व हे केवळ धार्मिक नाही, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेलं आहे.” त्यांनी हेही सांगितलं की स्वामी समर्थ आणि इतर संतांनी आपल्याला नेहमीच धर्माचं खरं स्वरूप समजावून दिलं आहे, आणि भाजपने त्यांच्या शिकवणीचा विसर टाकला आहे.
ठाकरे यांनी भाजपच्या वागणुकीवर टीका करत म्हटलं की, “महाराष्ट्रात एक भाषा, बिहारमध्ये दुसरी – हे द्वैध धोरण जनतेच्या भावनांशी खेळतं. अशा लोकांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता असतो. निवडणूक संपली की वापरून फेकून देतात.”
शेवटी त्यांनी शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमांचाही उल्लेख केला. “आम्ही रक्तदानाचं विश्वविक्रम केलं, तर त्यांनी काय केलं? बोगस सदस्य नोंदणी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर वैचारिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर जोरदार टीका केली असून, स्वतःचं हिंदुत्व व्यापक, समावेशक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप असल्याचं ठामपणे मांडलं.