महाराष्ट्रातील एसटी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. एसटी महामंडळाच्या हॉटेल व मोटेल थांब्यांवर अस्वच्छता, महागडे व दर्जाहीन अन्न, आणि गैरसोयीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील अनेक लांब पल्ल्याच्या एसटी मार्गांवर मधल्या प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी बसेस ठराविक हॉटेल वा मॉटेलवर थांबतात. प्रवाशांना या ठिकाणी खाण्या-पिण्याच्या सुविधा मिळतात, तसेच महिलांसह सर्व प्रवाशांसाठी स्वच्छतागृह आणि आरामाची गरजही भागवली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या सुविधा अत्यंत हलक्या दर्जाच्या असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
या तक्रारींमध्ये शिळ्या फराळाचा समावेश आहे, जेवण महाग व अशुद्ध असणे, प्रसाधनगृहांची अत्यंत अस्वच्छ स्थिती, आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची उद्धट वर्तणूक – अशा अनेक बाबी आहेत. यामुळे महिला व वयोवृद्ध प्रवाशांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो.
या मुद्द्यांची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रवाशांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हॉटेल थांब्यांवर प्रवाशांना योग्य दर्जाच्या, आरोग्यदायी व किफायतशीर सुविधा मिळाल्याच पाहिजेत. अन्यथा असे थांबे रद्द करून नव्या आणि योग्य पर्यायांचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
तसेच, मंत्री सरनाईक यांनी संपूर्ण राज्यातील एसटी थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना दिला आहे. या अहवालावर आधारित थांब्यांची फेरमुल्यांकन करून जे थांबे प्रवाशांच्या निकषांवर उतरले नाहीत त्यांना तात्काळ हटवण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
“हॉटेल थांब्यांवरून होणारे उत्पन्न एक वेळ गमावले तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयींशी कोणतीही तडजोड होणार नाही,” असे ठाम मत सरनाईक यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, त्यांनी एसटी प्रशासनाला हेही बजावले की कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता हे आदेश पार पाडावेत.
या निर्णयामुळे प्रवाशांना भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. एसटीचा प्रवास केवळ सुलभच नव्हे तर आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानकारक ठरेल, अशी अपेक्षा आता प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.