नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ‘निर्धार शिबिरा’त बोलताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजप सरकारवर हिंदुत्वाच्या नावाखाली अफवा पसरवल्याचा आरोप करत म्हटलं की, भाजप आता हिंदुत्व धोक्यात असल्याचे भासवत राजकारण करत आहे. सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा ठोकल्याची अफवा भाजपने पसरवली होती. रोहिंग्या आणि बांगलादेशी देशात कसे शिरले, याचा हिशेब कोणी मागतो आहे का?

सरकारवर गंभीर आरोप
महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले, “गृहराज्यमंत्री स्वतः सांगतात की शांततेत बलात्कार झाला आणि कुणालाच समजलं नाही. एवढं असंवेदनशील सरकार आज सत्तेत आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “लाडकी बहीण योजना आणण्याची केवळ तयारी दाखवली जाते, पण प्रत्यक्षात कोणतीच ठोस योजना नाही. यांचेच लोक कोर्टात जाऊन योजना बंद पाडतात. हे निव्वळ ढोंग आहे.”
शेतकऱ्यांची फसवणूक
“शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने निवडणुका समोर नसतानाही घेतला होता, पण सध्याचे सरकार केवळ घोषणा करते आणि धमक्या देतं,” अशी टीका करत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“लाडक्या ठेकेदारांची योजना”
“राज्यात सर्वत्र ‘लाडके कॉन्ट्रॅक्टर’ हीच योजना राबवली जाते. एसंशीच्या माध्यमातून मोठी लूट झाली. जात, धर्म आणि जिल्हा यांच्या नावाखाली समाजात फूट पाडली जाते. जनतेला एकमेकांत गुंतवून ठेवण्याचे हे राजकारण आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
भाजपमधील प्रवेश = स्वच्छता?
“ज्यांच्यावर आरोप होते, ते भाजपात गेल्यावर ‘धुतले’ गेले. विरोधकांवर टीका करत, पुलवामा आणि बालाकोटसारख्या मुद्द्यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर केला जातो. विकासावर चर्चा करायला कुणालाच तयारी नाही,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.