राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या वक्तव्यामुळे करुणा शर्मा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडे तब्बल 11 मोबाईल क्रमांक असल्याचं उघड केलं आहे. विशेष म्हणजे, या मोबाईल नंबरचा वापर करून विविध संवाद व घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंडे यांच्या निवासस्थानी झालेली ‘त्या’ कंपनीची बैठक
करुणा शर्मा यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे – मुंडे यांच्या घरी एका विशिष्ट कंपनीची बैठक झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. “त्यांनी काही चुकीचं केलं असं मी थेट म्हणत नाही, पण त्यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली हे नोंदवायला हवं,” असं त्यांनी सांगितलं.
11 मोबाईल नंबरची यादी आणि सीडीआर तपासणीची मागणी
करुणा शर्मा यांच्या मते, मुंडे यांच्या नावावर असलेल्या सर्व मोबाईल क्रमांकांची यादी त्यांच्या जवळ आहे. “हे नंबर मी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊ शकते, जर त्यांनी मागितले तर,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. 2022 मध्ये त्यांनी या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
“त्या” मोबाईल नंबरवरून माझ्याशी संवादही झाला
“ही मोबाईल नंबरची बाब अगदी सामान्य नाही. या क्रमांकांचा वापर केवळ संवादासाठी नव्हे, तर इतर अनेक गोष्टींसाठी केला जात होता. मी त्यांच्या पत्नीच्या नात्याने याची साक्ष देऊ शकते कारण त्या क्रमांकांवरून त्यांनी माझ्याशी संवाद साधले होते,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शोध घ्यावा आणि दोषी असल्यास कारवाई व्हावी
“या मोबाईल नंबरचा सीडीआर आणि व्हॉट्सअॅप डेटा तपासल्यास अनेक गोष्टी उघडकीस येतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी करुणा शर्मा यांनी शेवटी केली.