राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहिण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता अद्यापही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्वी हा हफ्ता गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिलला रक्कम जमा होईल, असं सांगण्यात आलं. मात्र अपेक्षेप्रमाणे अद्याप रक्कम खात्यात पोहोचलेली नाही.

या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे पैसे हे शासनाचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे पैसे महिलांना मिळणारच आहेत. फक्त थोडा विलंब झाला आहे, पण रक्कम कुठेही जाणार नाही.”
भुजबळांनी यावेळी इतर योजनांचाही उल्लेख केला. “संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेचेही निधी कधी कधी एका-दोन महिन्यांनी उशिरा मिळतो. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी एवढा मोठा विलंब होणार नाही. सर्वसामान्य कुटुंबात जसं मोठा खर्च झाल्यास इतर खर्च जुळवताना ओढाताण होते, तसंच काहीसं शासकीय आर्थिक व्यवस्थेचंही असतं,” असं ते म्हणाले.
त्यांनी महिलांना दिलासा देत सांगितलं की, काही दिवसांतच रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही.