राज्यातील निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांत हालचाली सुरू आहेत. शिवसेनेतील अंतर्गत हालचालींमुळे ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला जोर मिळालाय.

मात्र या चर्चांना उत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “खैरे यांनी आमच्या गटात येण्याचा विचारही करू नये,” असं ठाम विधान करत त्यांनी खैरेंना ‘गद्दार’ म्हणून हिणवलं.
भुमरे म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतःला निष्ठावान म्हणता आणि आम्हाला गद्दार ठरवता, तेव्हा आमच्याकडे येण्याचं कारणच काय? इतकी वर्ष पदे भूषवलीत, आता घरीच थांबा. मी खासदार म्हणून सांगतो, खैरेंना आमच्या पक्षात कोणतीही जागा नाही.”
त्याचवेळी त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही जोरदार टीका केली. “दानवे हे केवळ नावालाच नेते आहेत. त्यांनी गेल्या सहा वर्षांत कोणतंही ठोस काम केलं नाही,” असा आरोप करत भुमरे यांनी विरोधकांना डिवचलं.
“आता निवडणुका पार पडल्या आहेत आणि आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही,” असंही त्यांनी ठासून सांगितलं.
या सगळ्या घडामोडींमुळे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, आगामी काळात आणखी कोणती वादळी विधानं होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.