भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. लाखो लोक त्यांना आदर्श मानतात. मात्र बाबासाहेब स्वतः कोणाला आपले मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मानत होते, याचा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘माझी आत्मकथा’ या ग्रंथात स्पष्टपणे केला आहे.

या आत्मकथेत बाबासाहेबांनी लिहिलं आहे की, त्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जीवनदृष्टी देणारे तीन थोर व्यक्तिमत्वं त्यांचे गुरु होते — तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले.
गौतम बुद्ध – विचारांचा आद्य स्रोत
बाबासाहेबांच्या जीवनातील पहिले मार्गदर्शक म्हणजे भगवान बुद्ध. केळुसकर गुरुजींनी लिहिलेलं बुद्धचरित्र वाचून त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. त्या ग्रंथाच्या प्रभावामुळे त्यांनी पारंपरिक धार्मिक ग्रंथांवरील श्रद्धा बाजूला ठेवली आणि बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला. बाबासाहेब म्हणतात, “बुद्धांच्या विचारांनी मला नवीन दृष्टी दिली.”
संत कबीर – समानतेचा संदेश
दुसरे गुरु होते संत कबीर – ज्यांनी धर्म, जात, वर्णभेद यांना छेद दिला. बाबासाहेब म्हणतात की, कबीर हे खऱ्या अर्थाने महात्मा होते, जे सर्वांना समानतेची शिकवण देत होते. ते पुढे म्हणतात की मी गांधींना ‘मिस्टर गांधी’ म्हणतो कारण माझ्यासाठी महात्मा म्हणजे संत कबीर. त्यांच्या विचारांचा माझ्यावर खोल प्रभाव पडला.
महात्मा फुले – शिक्षणाचा दीप
तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले – स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक. बाबासाहेब लिहितात की, फुल्यांनी उघडलेली पहिली मुलींची शाळा आणि त्यांची क्रांतिकारी विचारसरणी हीच माझ्या जीवनाची प्रेरणा ठरली. फुल्यांच्या कार्यातून मला सामाजिक समतेचा मार्ग सापडला.
गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी बाबासाहेबांचे जीवन घडवले. ‘माझी आत्मकथा’ या ग्रंथात त्यांनी या तिघांना आपले मानसिक गुरु मान्य करत त्यांचा उल्लेख केलेला आहे. हे तीन दीपस्तंभच त्यांच्या वैचारिक प्रवासाचे प्रकाशवाट ठरले.