मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) यांनी आज शहरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईत गुप्त भेट झाली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी कोणाचेही नाव न घेता मिश्किल शैलीत टोला लगावला. “काल पौर्णिमा होती, काही लोक गावी जाऊन आले असतील… आणि मग ज्यांना ते भेटले, त्यांनी जरा काळजी घेतली पाहिजे… आमच्याकडे अनुभव आहे,” असं सूचक विधान त्यांनी केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी शाह यांच्यासमोर काही मुद्दे मांडले – अर्थ खात्याशी संबंधित फायलींवर सही होत नसल्याची तक्रार केली आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा विषय देखील उपस्थित केला.
यासोबतच, मुंबईतील पाण्याच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधताना ठाकरे म्हणाले की, महापालिकेतील प्रशासक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय काहीच करत नाहीत. शहरात टँकर असोसिएशनने संप पुकारला असताना, सरकारने काहीच हालचाल न केल्याची टीकाही त्यांनी केली.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे यांनी सरकारला 48 तासांची डेडलाईन दिली होती, जी आता संपत आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) प्रत्येक प्रभागात मोर्चे काढून पाण्याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.