केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता देशासाठी आणि जगासाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले. मात्र, त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांनी अमित शहांच्या भाषणातील एक मुद्दा उचलून टीकेची झोड उठवली. शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख ‘समाधी’ असा केल्याने राऊत भडकले. औरंगजेबाने ज्याप्रकारे महाराष्ट्रात छत्रपतींविरोधात कार्य केले, त्याला ‘समाधी’चा दर्जा देणे हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं.
“छत्रपतींच्या साक्षीने औरंगजेबाला समाधी?”
संजय राऊतांनी सवाल केला की, ज्याच्या विरोधात छत्रपतींनी आयुष्यभर लढा दिला, त्याच औरंगजेबाच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणे म्हणजे छत्रपतींचा अपमान आहे. हे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी खुद्द रायगडवरून, छत्रपतींच्या समाधीसमोर केले, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
“महायुतीचा एकोपा कुठे?”
राऊतांनी हेही नमूद केले की रायगडच्या कार्यक्रमात महायुतीतील नेते एकत्र दिसले नाहीत. एसंशि गटाचे काही लोक स्नेहभोजनालाही गैरहजर होते. आणि ज्यांच्याकडून छत्रपतीबद्दल योग्य माहिती मिळायला हवी, त्या नेत्यांकडून असं वक्तव्य होणं, हे अत्यंत खेदजनक आहे, असं ते म्हणाले.
औरंगजेबाबद्दल प्रेम का?
गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून का त्याच्याबद्दल इतकं प्रेम दाखवलं जातंय, असा टोला राऊतांनी लगावला. गेल्या काही महिन्यांपासून औरंगजेबाच्या थडग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. त्यासाठी चित्रपटाच्या विशेष शोचाही वापर केला गेला. मात्र आता त्याच थडग्याला “समाधी” म्हटले जात असल्याने राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ही महाराष्ट्राची दुर्दैवाची वेळ
शेवटी, संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्यांनी या मुद्द्यावर काहीही भाष्य न करता मौन बाळगले. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जर अन्य कोणी असं विधान केलं असतं, तर आजच्या सत्ताधारी गटाने मोठा गदारोळ केला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.